शबरीमला : हा तर हिंदूंवर दिवसाढवळ्या बलात्कार – हेगडे

anant-kumar-hegde
नवी दिल्ली – केरळ सरकार शबरीमला प्रकरण हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून हा तर हिंदू लोकांवर दिवसाढवळ्या केलेला बलात्कार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. काल सकाळी दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजप कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. अशाच एका निदर्शनादरम्यान, राजधानीत भाजप कार्यकर्ते आणि पोलिसात झडप झाली. त्यामुळे शबरीमला प्रकरणी वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुधवारी सकाळी चाळीशीतल्या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांना यावेळी पोलिसांनी संरक्षण दिले होते. यानंतर अय्यप्पा भक्त आणि भाजपने याचा विरोध केला. मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणे, मुख्य रस्त्याची अडवणूक करणे असे प्रकारही दिवसभरात पाहायला मिळाले.

शबरीमला अय्यप्पा मंदिरात पहाटे ३.४५ वाजता चाळीशीतील दोन महिला भाविकांनी प्रवेश केला. बिंदू आणि कनकदुर्गा अशी त्यांची नावे असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘बरीमला मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेला आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले होते, असे ते म्हणाले.

मंदिर चाळीशीतील २ महिलांच्या प्रवेशामुळे अपवित्र झाले आहे. ते शुद्धीकरणाच्या धार्मिक विधींसाठी बंद करण्यात येत असल्याची घोषणा करत बुधवारी मंदिराचे दरवाजे बंद केले. शुद्धीकरण विधी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा उघडण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, महिलांचा प्रवेशामुळे मंदिर अशुद्ध झाल्याचा दावा करणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. २१ व्या शतकात कट्टर परंपरावादी बुरसटलेल्या मानसिकतेच अडकून पडले आहेत, अशी टीका करण्यात येत आहे.

Leave a Comment