जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचा बहुमान खोटा

old
फ्रान्समधील एका महिलेच्या नावे असलेला जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचा बहुमान खोटा असल्याचे रशियातील संशोधकांनी म्हटले आहे. या महिलेला हा मान चुकून मिळाला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

जीन काल्मेंट ही महिला 122 वर्षे 164 दिवस जगली होती. तिचा मृत्यू 1997 मध्ये झाला होता. जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून या महिलेच्या नावावर विक्रम नोंदविण्यात आला होता. हा विक्रम आजही अबाधित आहे.

मात्र हा विक्रम चुकीचा असल्याचे रशियातील संशोधक निकोलाय झाक यांचे म्हणणे आहे. व्हॅलेरी नोव्होसेलोव्ह या आपल्या सहकाऱ्यासोबत त्यांनी अनेक महिने जीन काल्मेंट यांच्या चरित्राचा तसेच त्यांच्या मुलाखती व छायाचित्रांचा अभ्यास केला. जीन काल्मेंट रहात असलेल्या दक्षिण फ्रान्समधील आर्लेस शहरातील रेकॉर्डही त्यांनी तपासले.

“या सर्व साहित्याच्या अभ्यासावरून मी या निष्कर्षाला आलो, की जीन काल्मेंट यांच्या मुलीने त्यांच्या आईचे नाव घेतले होते,” असे झाक यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. झाक यांनी आपला अहवाल रिसर्चगेट या लोकप्रिय संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. झाक हे मॉस्को स्टेट यूनिव्हर्सिटीमधील मॉस्को सोसायटी ऑफ नॅच्युरलिस्ट या संस्थेचे सभासद आहेत.

झाक यांच्या म्हणण्यानुसार, 1934 मध्ये क्लेमेंट यांची मुलगी येवोन हिचा नव्हे तर खुद्द जीन क्लेमेंट यांचा मृत्यू झाला होता. मात्र येवोन हिने संपत्तीवरील कर भरावा लागू नये म्हणून आपल्या आईची ओळख स्वतः धारण केली. हे खरे असल्यास 1997 मध्ये मरण पावलेली व्यक्ती जीन क्लेमेंट या नव्हे तर त्यांची मुलगी ही होती आणि तिचे वय 99 वर्षाचे होते.

झाक यांच्या या संशोधनावर काही जणांनी टीका केली आहे तर काही जणांनी त्याचे स्वागत केले आहे.

Leave a Comment