9/11चे रहस्य उघड करण्याची हॅकर गटाची धमकी, खंडणीची मागणी

hacker
अमेरिकेत 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्याशी संबंधित विमा कंपन्या आणि सरकारी संस्थांमधून चोरलेली गोपनीय कागदपत्रे जाहीर करण्याची धमकी हॅकरच्या एका गटाने दिली आहे. या कागदपत्रातून 9/11चे रहस्य उघड होईल असे या गटाचे म्हणणे आहे. ही कागदपत्रे उघड करायची नसतील तर खंडणी देण्याची मागणी या गटाने केली आहे.

डार्क ओव्हरलॉर्ड असे या गटाचे नाव आहे. हा एक व्यवसायिक हॅकर गट असून नेटफ्लिक्स, प्लास्टिक सर्जरी क्लीनिक तसेच अन्य संवेदनशील संस्थांची हॅकिंग करण्यासाठी हा गट ओळखला जातो. पेस्टबिन या वेबसाईटवर या गटाने एक पोस्ट प्रकाशित केली असून त्यात ही धमकी दिली आहे.

डार्क ओव्हरलॉर्डने एन्क्रिप्ट केलेल्या 10 जीबी आकाराच्या दस्तावेजाची एक लिंकही प्रकाशित केली आहे. आपली मागणी पूर्ण केली नाही तर या एन्क्रीप्शनची की जाहीर करण्याची धमकी या गटाने दिली आहे.

जागतिक इतिहासातील सर्वाधिक विध्वंसक हल्ल्यांपैकी एक असलेल्या या हल्ल्यामागे नक्की काय होते, याची माहिती या दस्तावेजांमध्ये आहे. ही एकूण 18,000 गोपनीय कागदपत्रे आहेत आणि त्यातून 9/11 च्या कारस्थानामागील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, असेही या गटाने म्हटले आहे.

अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ले केले होते. यातील 2 विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींवर आदळण्यात आली. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण 2974 बळी गेले होते.

Leave a Comment