विमा पॉलिसीचे क्लेम आता व्हॉट्सअॅपवर मिळणार

whatsapp
मुंबई – अलीकडच्या काळात मोबाईलधारकांसाठी व्हॉट्सअॅप परवनीचे अॅप बनले असून व्हॉट्सअॅप माहिती नाही, असा मोबाईलधारक सापडणे म्हणजे दुर्मिळच म्हणायला हवे. व्हॉट्सअॅपचा वापर वाढल्यामुळे आता विविध सेवा-सुविधा या माध्यमातून लोकांना देण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. बुकमायशोवर काही महिन्यांपूर्वी काढलेली तिकीटे प्रेक्षकांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवली जायला लागली. आता भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सने विमा पॉलिसीच्या पावत्या आणि क्लेम थेट तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅपवर पाठवायला सुरुवात केली.

याबाबत माहिती देताना भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास शेठ म्हणाले की, पॉलिसीची कागदपत्रे, प्रिमिअम पावत्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविण्यास आम्ही सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने ग्राहकांना ही सेवा देणारी भारती एक्सा ही पहिलीच विमा कंपनी आहे. विमा पॉलिसीचा करार, पॉलिसीच्या नूतनीकरणाची कागदपत्रे, क्लेमसंदर्भातील माहिती व्हॉट्सअॅपवर दिली जाईल. कंपनीकडून ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. त्यापैकीच एक व्हॉट्सअॅप असेल. आमचे प्रतिनिधी यासह इतरही माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या काळात तंत्रज्ञानावर आधारित संवाद खूप महत्त्वाचा झाला आहे. या पद्धतीच्या संवाद प्रक्रियेत लोकही पटकन सहभागी होतात. त्यामुळे ग्राहकांपर्यंत त्यांच्यासाठी महत्त्वाची असलेली कागदपत्रे लवकर पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअॅप महत्त्वाचे माध्यम आहे. आमच्या ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ सुविधा पुरविण्यासाठी आम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment