राफेल घोटाळ्यावरील प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी संसद सोडून पळून गेले मोदी – राहुल गांधी

rahul-gandhi1
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदी राफेल घोटाळ्यावरील प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी संसद सोडून पळून गेल्याचा आरोप राहुल यांनी ट्विट करून केला आहे. पंतप्रधान मोदी राफेलच्या परीक्षेतून पलायन करत आज पंजाबमध्ये लव्हली युनिर्व्हसिटीत भाषण देण्यासाठी गेले आहेत. माझ्या वतीने हे चार घोटाळ्यावरील प्रश्न तिथल्या विद्यार्थ्यांनीच मोदींना विचारावेत, असे आवाहन राहुल गांधींनी ट्विटरवरून केले आहे.

पंतप्रधान सोमवारच्या लोकसभेतील राफेलवरील चर्चेत सहभागी न होता लपून बसल्याचे म्हणत राफेल करारावरून त्यांनी चार प्रश्न उपस्थित केले होते. १२६ राफेल विमानांऐवजी ३६ विमानांचीच खरेदी का करण्यात आली, प्रति विमानाचे ५६० ऐवजी १६०० कोटी रूपये का , राफेलची फाईल मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये का आहे व त्यात काय आहे आणि राफेलचे कंत्राट हिंदुस्थान एरॉनॉटिक्सऐवजी अनिल अंबांनींच्या रिलायन्सलाच का देण्यात आले? हे चार प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

राहुल गांधींच्या ट्विटमध्ये तिसरा प्रश्नच नसल्यावरून भाजपने त्यांची खिल्ली उडवत गांधींनी पहिल्यांदा आकडे शिकावेत, असा खोचक सल्ला दिला होता. देशातील या जुन्या पक्षाच्या अध्यक्षाला लढाऊ विमानांची माहिती नसणे हे दुर्दैवी असल्याचे अरुण जेटलींनीदेखील म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. राहुल गांधींनी यावर उत्तर देत लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रिकरांच्या कथित टेपविषयी बोलण्याची परवानगी नाकारल्याने तिसरा प्रश्न दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

Leave a Comment