मोदींनी उद्योगपतींना दिला शेतकऱ्यांचा पैसा – राहुल गांधी

rahul-gandhi
नवी दिल्ली – संसदेत अरुण जेटलींनी केलेले दावे खोटे असून राफेल विमानाची किंमत वाढली कशी, हा प्रश्न आहे. वस्तुस्थिती ही आहे, की अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा मोदींनी करुन दिला. सत्य लपवले जाऊ शकत नसल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटले आहे. मोदींनी देशातील तरुण आणि शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे चोरुन ते उद्योगपतींना दिल्याचा आरोप गांधी यांनी केला.

दरम्यान अरुण जेटली यांनी सांगितले की, आम्ही राफेल विमानांची किंमत सांगितली नाही. पण, त्यांनी स्वतः संसदेत सांगितले की ही संपूर्ण डील ५८ हजार कोटींची आहे. ५८ ला ३६ ने भागले तर उत्तर १६०० येते. तेव्हा ही किंमत त्यांनीच सांगितली. हा काँग्रेसचा मनाचा आकडा नसल्याचे गांधी म्हणाले. विमानाची किंमत ५२६ कोटी होती. ती वाढून १६०० झाली कशी हा प्रश्न आहे. याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, असेही गांधी म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांना राफेल कराराबाबत माहित नव्हते. हवाई दलाला माहित नव्हते. याला हवाई दलाने विरोध केला होता. तरी सुद्धा मोदींनी एकट्यानेच हा करार केला. स्वतःच्या मनाने विमानाची किंमत वाढवली. अनिल अंबानींचे नावही त्यांनीच सुचवले असा आरोप राहुल गांधींनी केला.

विमान बनविण्याचा अनिल अंबानींना अनुभव नाही. नुकतीच त्यांनी कंपनी स्थापन केली होती. तरी देखील त्यांना या कराराचा भागीदार बनविण्यात आले. ४५ हजार कोटींचे कर्ज अनिल अंबानींवर आहे. यातून त्यांना वर काढण्यासाठीच हा करार केल्याचे गांधी म्हणाले. अनिल अंबानींना मोदींनी ३० हजार कोटींचा फायदा करुन दिला.

Leave a Comment