अमेरिकेविरुद्ध वाईट परिस्थितीसाठी तयार रहा –  क्युबाच्या माजी अध्यक्षाचे आवाहन

raul-castro
अमेरिकेने पुन्हा संघर्षाचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे नागरिकांनी अमेरिकेविरुद्ध वाईटातील वाईट परिस्थितीसाठी तयार रहावे, असे आवाहन क्युबाचे माजी अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी आपल्या देशवासीयांना केले आहे. कॅस्ट्रो हे क्युबाच्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत.

क्युबाने संरक्षण क्षेत्रातील सिद्धता वाढवली पाहिजे, असेही कॅस्ट्रो म्हणाले. क्युबाच्या राज्यक्रांतीला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशाच्या पूर्व भागातील सँटियागो दि क्यूबा या शहरात मंगळवारी कॅस्ट्रो यांनी लोकांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

“कुठल्याही उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी काटेकोरपणे तयारी करणे, वाईटातील वाईट परिस्थितीसाठी तयार राहणे हे क्युबाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यासंदर्भात कुठल्याही अनिश्चिततेला किंवा सुधारणेला वाव असता कामा नये,” असे 87 वर्षीय कॅस्ट्रो म्हणाले.

क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबामध्ये 1959 मध्ये क्रांती केली होती. फिडेल यांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली होती. अमेरिकेने ही क्रांती दडपून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यामुळे अमेरिका आणि क्युबा यांचे संबंध विकोपाला गेले होते. मात्र 2015 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे तत्कालीन अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांची पनामा येथे भेट होऊन ऐतिहासिक हस्तांदोलन झाले होते. त्यामुळे अमेरिका आणि क्युबा यांचे संबंध निवळले होते. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून हे संबंध पुन्हा बिघडले आहेत.

Leave a Comment