म्हशीच्या मांसाला ‘गोमांस करण्याची’ धमकी – पशुवैद्यकीय महिला डॉक्टरला अटक

bribe
म्हशीच्या मांसाला गोमांस म्हणून जाहीर करून तसे न करण्यासाठी पैसे मागणाऱ्या महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला असून या महिलेने दिलेली धमकी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

राज्यातील मोरादाबाद येथे हा प्रकार घडला. येथील महिला पशुवैद्यकीय डॉक्टर सुमन यांनी एका व्यक्तीकडे 30 हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच पैसे न मिळाल्यास हे गोमांस म्हणून जाहीर करण्याची धमकी दिली होती. डॉ. सुमनची ही मागणी गावकऱ्यांनी चित्रित केली.

याबाबत घडले असे, की सुमारे एका आठवड्यापूर्वी पोलिसांनी काशीपूर येथे एका व्यक्तीला पकडले होते. ही व्यक्ती आपल्या घरी एका पार्टीसाठी 5 किलोग्रॅम मांस घेऊन जात होते. त्याला पोलिसांनी गोमांस बाळगण्याच्या कारणावरून हटकले होते. त्याने पोलिसांना ते म्हशीचेच मांस असल्याचे सिद्ध करण्यासाठी पावतीही दाखविली. पण पोलिस अधिकाऱ्यांना ते पटले नाही.

तेव्हा तपासणीसाठी त्यांनी डॉ. सुमन यांना बोलावले. तपासणीसाठी आलेल्या महिला डॉक्टरने जमलेल्या तरुणांना आणि गावकऱ्यांना 30000 रुपयांची लाच मागितली, अन्यथा ते गोमांस घोषित करण्याची धमकी दिली. हे पैसे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांनी काही वेळ मागितला. मात्र जेव्हा ते लाच देण्यास आले तेव्हा त्यांनी कॅमेऱ्याद्वारे या घटनेचे चित्रीकरण केले, असे इन्किलाब वृत्तपत्राने म्हटले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे त्यांनी म्हटल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.

Leave a Comment