शत्रुघ्न सिन्हा आता पाटणा विमानतळावर ‘सामान्य व्यक्ती’

shatrughan-sinha
प्रसिद्ध अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांचा पाटणा विमानतळावर अतिमहत्त्वाची व्यक्ती (व्हीआयपी) हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे सिन्हा हे आता एक सामान्य व्यक्ती ठरले आहेत.

सिन्हा यांना व्हीआयपी म्हणून आतापर्यंत अंगझडतीतून सूट देण्यात आली होती. तसेच त्यांना धावपट्टीपर्यंत स्वतःच्या वाहनाने जाता येत होते. या सुविधा आता त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या आहेत, असे पाटण्यातील जयप्रकाश नारायण विमानतळाचे संचालक राजेंद्रसिंग लाहौरिया यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

“या सुविधा त्यांना देण्यात आल्या होत्या त्या आदेशाची मुदत जूनमध्ये संपली. त्यानंतर ही सुविधा पुढे वाढविण्याच्या कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत,” असे लाहौरिया यांनी सांगितले.

सिन्हा हे पाटणा साहिब मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र गेले काही महिने ते सातत्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. भाजपमध्ये ते बंडखोर मानले जातात आणि पुढची लोकसभा निवडणूक ते राष्ट्रीय जनता दल किंवा अन्य पक्षाकडून लढणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच त्यांनी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली होती.

Leave a Comment