रजनीकांत देणार चक्रीवादळग्रस्तांना घरे

rajanikanth
तमिळनाडूत नुकत्याच झालेल्या गजा चक्रीवादळात घरे गमावलेल्या झोपडपट्टीवासियांना तमिळ सुपरस्टार रजनीकांत हे घरे बांधून देणार आहेत. रजनीकांत यांच्या रजनी मक्कळ मण्ड्रम संस्थेने ही घोषणा केली आहे.

नागपट्टिनम जिल्ह्यातील पाच गावांमध्ये गजा चक्रीवादळात ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांना 15 नवीन घरे बांधून देण्याचे संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रत्येक घराच्या बांधकामाला सुमारे 1.5 लाख रुपये खर्च होण्याची शक्यता असून हे बांधकाम दोन महिन्यांच्या आत पूर्ण होईल, असे संघटनेने म्हटले आहे. ही संघटना रजनीकांत यांच्या प्रस्तावित राजकीय पक्षाचा पूर्वावतार मानण्यात येते.

रजनीकांत मक्कळ मण्ड्रमच्या कार्यकर्त्यांनी किनारपट्टीवरील या जिल्ह्यात चक्रीवादळामुळ जास्तीत जास्त हानी झालेल्या कुटुंबांची माहिती गोळा करण्यास सांगितले होते. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेले अडीच महिने चक्रीवादळग्रस्त गावांमध्ये पुनर्वसनाचे कार्य केले. थिरुवरूर, नागपट्टिनम, तंजावुर, पुदुकोट्टै येथील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आणि त्यांनी मण्ड्रमच्या मुख्यालयात एक अहवाल पाठविला. त्यानंतर घरे बांधण्याची योजना आखण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.

रजनीकांत यांनी आतापर्यंत 50 लाख रुपयांचे मदत साहित्य वितरित केले आहे. त्यांच्या चाहत्यांनी 3 कोटी रुपयांच्या साहित्याचे वितरण केले आहे, असा दावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याने केला आहे.

Leave a Comment