हेल्मेटसक्तीच्या कारवाईतून पुणे पोलिसांनी वसूल केला तीन लाखांपेक्षा जास्त दंड

helmet
पुणे : हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा असलेला विरोध झुगारुन पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तब्बल 7 हजार 490 जणांवर पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाई केली.

पुणे पोलिसांनी या कारवाईतून तीन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. ही कारवाई पुढे अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईचा धसका घेत पुणेकरांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

या हेल्मेट सक्तीला पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. पुणेकर 3 जानेवारीला हेल्मेटसक्ती विरोधात विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी रॅली काढून आपले विरोध प्रदर्शन करणार आहेत. रॅलीनंतर पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना निवेदन दिले जाणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचे हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच म्हणणे आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी समितीने केली.

Leave a Comment