लोक ‘राफेल घोटाळा’ ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’ घोटाळ्यामुळे विसरणार नाहीत – सामना

uddhav-thakre
मुंबई- ब्रिटीश दलाल ख्रिस्तियन मिशेलने ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी चौकशीदरम्यान दिल्ली न्यायालयात सोनिया गांधींचे नाव घेतल्याची माहिती दिल्यामुळे राफेल विमान घोटाळा लोक विसरतील, असे कोणी समजू नये, असा खोचक टोला शिवसेनेने भाजपला मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे.

आम्हाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल कणभरही ममत्व नाही. पण सरकारी यंत्रणांचा वापर राजकीय षडयंत्रासाठी करू नये. २०१९ आधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना घेरण्याचा हा प्रकार आहे. मिशेलला ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी दुबईतून ताब्यात घेण्यात आले आणि भारतात आणले गेले. त्यानंतर त्याने चौकशीदरम्यान सोनिया गांधींचे नाव या घोट्यासोबत जोडले. मिशेलला ज्यावेळेस भारतात आणले गेले त्यावेळेस ५ राज्यांमधील निवडणुकांचा प्रचार तापला होता. मोंदींनी तेव्हा प्रचारादरम्यान मिशेलचा उल्लेख केला होता. कारण त्यांना अगोदरच माहिती होते की, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे नाव मिशेल घेणार. त्यामुळे त्यांनी अगोदरच गांधीकडे बोट दाखवून तपासाची दिशा स्पष्ट केली होती.

४३२ कोटी रुपयांची लाच ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात वाटण्यात आली. या प्रकरणात देशाच्या माजी हवाई दलप्रमुखांना अटक झाली ही धक्कादायक बाब आहे. पण संबंधित आरोपी कितीही मोठे असोत त्यांना जाब द्यावाच लागेल. परंतु, ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात मिशेलने सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नाव घेतले याचा अर्थ राफेल घोटाळा प्रकरण लोक विसरतील असे कुणी समजू नये. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात ४३२ कोटी रुपयांची दलाली वाटली. राफेल प्रकरणात विमानांच्या किमती वाढवून घेतल्या. ज्यामुळे एका उद्योपतीचे कल्याण झाले. मात्र, या मिशेलपुराणामुळे महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर सारखे विषय मागे पडतील आणि मिशेल महाराजांचे नामजप सुरू होईल. मात्र, या बा-चा-बा-ची तून देशाला आणि जनतेला काय मिळेल? असा सवालही करण्यात आला आहे.

Leave a Comment