माकडाला खाऊन सोशल मीडियावर बढाई, मेघालयात एकाला अटक

monkey
एका संरक्षित प्रजातीच्या माकडाला मारून खाल्ल्याची बढाई करणाऱ्या व्यक्तीला मेघालयात पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने सोशल मीडियावरून आपल्या या कृत्याची बढाई मारली होती.

या व्यक्तीच्या विरोधात वन्यप्राणी संरक्षण कायदा, 1972 च्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. या कायद्यानुसार संरक्षित असलेल्या ऱ्हिसस मकॅक प्रजातीच्या माकडाची त्याने शिकार करून त्याला खाल्ल्याचा आरोप आहे.

वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यातून या माणसाला पकडण्यात आले, असे या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एम. जी. आर. कुमार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

या व्यक्तीने माकडाला मारून ते भाजले आणि ते शिजवून खाल्ले. त्यानंतर त्याने त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रकाशित केली. याची माहिती पेटा इंडिया संस्थेला कळाली आणि या संस्थेने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ऱ्हिसस माकड ही जागतिक पातळीवरील माकडांची सर्वात जुनी ज्ञात प्रजाती आहे. ते जगाच्या बहुतांश भागात आढळतात. आययूसीएन या जागतिक संघटनेने या प्रजातीचा लाल यादीत म्हणजे अत्यंत दुर्मिळ प्रजातीत समावेश केला आहे.

Leave a Comment