सरकार सोशल मीडियाच्या नियमाबाबत जाणून घेणार कायदेतज्ज्ञांचे मत

social-media
नवी दिल्ली – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय राजधानीत सोशल मीडियाचे नियम व वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत महत्त्वाची बैठक घेणार आहे. केंद्रीय आयटी मंत्रालयाचे अधिकारी कायदेतज्ज्ञांसह वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेची बाजू मांडणाऱ्या लोकांशी या ५ जानेवारीच्या बैठकीत चर्चा करणार आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारीला माहिती तंत्रज्ञान विभाग १ तास ट्विटरवर सार्वजनिक चर्चा करणार आहेत. सर्व लोकांसाठी ही चर्चा खुली असणार आहे. केंद्र सरकार सोशल मीडियाबाबतचे नियम आणि त्यावरील शंका दूर करण्यासाठी उत्सुक असून सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्यात महत्त्वाचा बदल केला आहे. २४ डिसेंबरला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कच्चा मसुदा जाहीर केला. या मसुद्यानुसार केंद्र सरकारच्या ११ सुरक्षा संस्थांना मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावरची माहिती मिळविण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांनी गुगल, फेसबुक,व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी गेल्या महिन्यात चर्चा केली. नवे नियम आणि त्याबाबत लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावर्षी लोकसभा निवडणुका पार पडत असतानाच केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी कठोर नियम केले आहेत. तसेच त्याचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांना शोधण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत.

वैयक्तिक माहिती गोपनीयतेचा भंग होत असल्याचे विरोधी पक्षांनी सांगत सोशल मीडियाच्या नव्या नियमांना विरोध केला. या नियमाने भारत हा लोकांच्या खासगी गोष्टींबाबत हस्तक्षेप करणारा देश होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली.

Leave a Comment