शबरीमलात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेला मिळणार संरक्षण – विजयन

vijayan
तिरुवनंतपुरम – शबरीमला अय्यप्पा मंदिरात पहाटे ३.४५ वाजता चाळीशीतील दोन महिला भाविकांनी प्रवेश केला. त्यांची बिंदू आणि कनकदुर्गा अशी नावे असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर त्यांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेला आवश्यक सुरक्षा पुरवण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना दिले असल्याचे म्हटले आहे.

शबरीमला मंदिर रविवारी संध्याकाळी २१ दिवसांच्या ‘मकरविलक्कू’ महोत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत उघडण्यात आले होते. मंडल पूजेच्या समारोपानंतर २७ डिसेंबर रोजी मंदिर बंद करण्यात आले होते. मंदिर चाळीशीतील २ महिलांच्या प्रवेशामुळे अपवित्र झाले आहे. ते आता शुद्धीकरणाच्या धार्मिक विधींसाठी बंद करण्यात येत असल्याची घोषणा करत बुधवारी मंदिराचे दरवाजे बंद केले. ते शुद्धीकरण विधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उघडण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, महिलांचा प्रवेशामुळे मंदिर अशुद्ध झाल्याचा दावा करणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. २१ व्या शतकात कट्टर परंपरावादी बुरसटलेल्या मानसिकतेच अडकून पडले आहेत, अशी टीका करण्यात येत आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. मात्र, कट्टर परंपरावाद्यांच्या निषेधामुळे अद्यापपर्यंत एकही महिला मंदिरात प्रवेश करू शकली नव्हती.

Leave a Comment