कुंभमेळ्यातील लक्झरी तंबूत राहण्यासाठी प्रति रात्र मोजोवे लागणार ३५,००० रुपये

tent
५ जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होत असून या महासोहळ्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. तेथे प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असल्यामुळे येथील वातावरण बॉलीवूडच्या एखाद्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असे झाले आहे. येथील गंगा नदीपासून अवघ्या १०० मीटरवर पन्नास एकरांमध्ये १००० भव्य लक्झरी व्हिलाजही उभारण्यात येत असून त्यांच्या उभारणीसाठी बॉलीवूडमधील कलादिग्दर्शक अनंत बाबुराव शिंदे काम करत आहेत. ज्यांनी संजय लीला भन्साळीसाठी देखील काम केले आहे.

या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार याठिकाणी तीन प्रकारचे लक्झरी व्हिला किंवा तंबू असून सगळ्यात महागडा तंबू ३५,००० रुपये प्रति रात्र या दराचा आहे. तर डिलक्स व लक्झरी अशा उर्वरीत प्रकारांसाठी प्रति रात्र अनुक्रमे १३,००० रुपये व १८,००० रुपये आकारण्यात येत आहेत. ८० टक्के तंबू या एकूण व्हिलांपैकी आधीच बुक झाल्याचे हितकरी प्रॉडक्शनच्या सत्येंद्र कुमार यांनी सांगितले. ९०० चौरस फुटांचा प्रत्येक व्हिला असून ते दोन बेडरूम्सनी सज्ज आहे. तसेच यात टिव्ही, सोफा आदी सुविधाही देण्यात येणार आहे.

या भागाचे इंद्रप्रस्थम असे नामकरण करण्यात आले असून त्याठिकाणी ४० दुकाने व चार रेस्टॉरंट्सही आहेत. या रेस्टॉरंट्समध्ये बॉलीवूड, वैदिक, विविध राज्यातल्या लोककला अशा विविध थीम्स रचण्यात आल्या आहेत. याखेरीज भाविकांच्या राहण्याच्या अन्य ठिकाणीही सोयी करण्यात येत असून ८०० ते ९०० रुपयांपासून १० ते १२ हजार रुपये प्रति रात्र अशा दराने तंबूंची सोय करण्यात येत आहे.

Leave a Comment