उत्तर प्रदेशात उभा राहणार आणखी एक 100 फुटी पुतळा

uda-devi
लोकसभा निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजप सरकार आणखी एक 100 फुटी पुतळा उभारणार आहे. त्यातून राज्यातील पासी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाचे योगदान असलेल्या पासी समाजाच्या उदा देवी या थोर महिलेचाहा पुतळा असणार आहे. तो राजधानी लखनौत उभारण्यात येणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 71 जागा मिळविल्या होत्या. यातील 6 जागा पासी समुदायाची जास्त संख्या असलेल्या भागांत होत्या. तसेच पासी समुदायाचा प्रभाव असलेल्या 23 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत.

या संबंधात मोहनलालगंज येथील पक्षाचे खासदार आणि भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कौशल किशोर यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी लोखंड दान करण्याचे आवाहन पासी समुदायाला केले आहे. उदा देवी यांचा एक छोटा पुतळा लखनऊमधील सिकंदर बाग येथे उभा आहे. हा पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी 1990 मध्ये उभारला होता.

‘उदा देवी यांनी 1857मध्ये ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीच्या विरोधात स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेतला होता. त्यांनी त्यावेळी सिकंदर बागजवळ तीन डझन ब्रिटिश सैनिकांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर त्या शहीद झाल्या,’ असे कौशल किशोर म्हणाले.

Leave a Comment