आजपासून पुण्यातील हेल्मेटसक्तीला सुरुवात

helmet
पुणे – नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून (मंगळवारी) पुण्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे हेल्मेट विरोधी कृती समितीकडून हेल्मेट सक्तीला विरोध करण्यात आला असून नवी पेठेतील गांजवे चौकाजवळील आचार्य आनंदॠषीजी रक्तपेढीत यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. गंभीर स्वरुपाच्या अपघातातील जीवितहानीचे प्रमाण हेल्मेट वापरल्यास कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. या नियमाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून होईल, असे त्यांनी म्हटले होते. यानुसार आजपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.

गंभीर स्वरुपाची दुखापत हेल्मेट परिधान केल्याने टाळता येते. पोलिसांकडून आगामी वर्षांत रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे. दुसरीकडे हेल्मेटसक्तीविरोधात आचार्य आनंदॠषीजी रक्तपेढीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यास कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे, संदीप खर्डेकर, शांतीलाल सुरतवाला, रुपाली पाटील, धनंजय जाधव, सुरेश जैन, मयूरेश अरगडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

Leave a Comment