दारु पिऊन गाडी चालवताना आढळल्यास 6 महिन्यांसाठी रद्द होणार परवाना

drink-&-drive
मुंबई : दारु पिऊन गाडी चालवताना आढळल्यास 6 महिन्यांसाठी त्या चालकाचा परवाना रद्द होणार असून हा निर्णय परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. ज्या वाहनाचा विमा नसेल ते वाहन जप्त केले जाणार आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असेल. विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. वाढते अपघात रोखण्याच्या दृष्टीने बैठकीत व्यापक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांनी सांगितले.

वाहनचालकांनी दारुच्या नशेत वाहने चालविल्याने अनेक अपघात हे होत असल्याचे विविध अहवालातून निष्पन्न झाले आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांमार्फत हे रोखण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील २ महिन्यात राज्यात 12 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाया या दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी झाल्या आहेत. विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपेलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास आणि दुर्देवाने अशा वाहनाचा अपघात झाल्यास जखमी किंवा मृतास कोणत्याही प्रकारचे विमालाभ मिळत नाहीत. सध्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण आता यापुढे अशा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.