एचडीएफसीच्या गृहकर्जांच्या व्याजदरात वाढ

HDFC
मुंबई – एचडीएफसीने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या गृहकर्जांच्या व्याजदरात वाढ करून ग्राहकांना झटका दिला आहे. रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) एचडीएफसीने ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. एचडीएफसीच्या गृहकर्जाचे दर या दरावरच अवलंबून असल्यामुळे गृहकर्जांचे व्याजदरही आता वाढणार आहेत. यामुळे विविध वर्गवारीतील व्याजदरांमध्ये ८.९० ते ९.१५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे बॅंकेने स्पष्ट केले.

नव्या व्याजदरांची अंमलबजावणी सुरू आजपासून होणार आहे. ३० लाखांपर्यंतचे गृहकर्ज आता ८.९५ टक्के व्याजदराने उपलब्ध होईल. हे व्याजदर महिलांसाठी ८.९० टक्के एवढे असेल. ३० लाखांपेक्षा जास्त आणि ७५ लाखांपेक्षा कमी गृहकर्जासाठी नवा व्याजदर ९.१० टक्के असणार आहे. हाच दर महिलांसाठी ९.०५ टक्के एवढा असेल.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बॅंकेने गेल्या महिन्यात १० तारखेला आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षाच्या कालावधीसाठी बॅंकेच्या एमसीएलआरमध्ये ८.५५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. दोन वर्षांसाठी बॅंकेचा एमसीएलआर ८.६५ टक्के करण्यात आला होता. तर तीन वर्षांसाठी हाच दर ८.७५ टक्के करण्यात आला होता.

Leave a Comment