अमेरिकेत सायबर हल्ल्यामुळे वृत्तपत्र वाटपावर परिणाम

newspaper
अमेरिकेत देशाबाहेरून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे शनिवारी अनेक वृत्तपत्रांच्या वाटपावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रिब्यून पब्लिशिंग नावाच्या कंपनीच्या संगणक नेटवर्कवर आधी हा हल्ला झाला. ही कंपनी देशभरातील अनेक वृत्तपत्रांची निर्मिती आणि छपाई करते. त्यामुळे लॉस एंजेल्स टाईम्स आणि सॅन दिएगो युनियन ट्रिब्यून या वृत्तपत्रांसहित अनेक वृत्तपत्रे शनिवारी ग्राहकांपर्यंत उशिरा पोचली. तसेच न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रांच्या वितरणावरही त्याचा परिणाम झाला, असे लॉस एंजेल्स टाईम्सने जाहीर केले आहे.

“या हल्ल्याचा उद्देश माहिती चोरणे हा नव्हता तर मूलभूत सोईसुविधा विस्कळीत करणे हा होता,” असे या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

“अनेक वृत्तपत्रांच्या सेवांवर परिणाम करणाऱ्या संभाव्या सायबर हल्ल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. अन्य सरकारी व औद्योगिक संस्थांसोबत मिळून ही परिस्थिती समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,” असे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटी खात्याने एका निवेदनात म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेला ऱ्यूक हा संगणक विषाणू या हल्ल्यामागे असल्याचे ट्रिब्यून कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हा विषाणू खंडणीसाठी पसरविण्यात येणाऱ्या रॅन्समवेअर प्रकारचा आहे.

Leave a Comment