भाजपकडून आमच्या आमदारांना प्रत्येकी 25-30 कोटी रुपये – सिद्धरामय्यांचा आरोप

Siddaramaiah
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे नेते घोडेबाजार करत असून काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी 25-30 कोटी रूपयांची ऑफर देत आहेत, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

रविवारी म्हैसूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सिद्धरामय्या यांनी हा आरोप करतानाच ‘ते भ्रष्ट नाहीत तर त्यांना एवढे प्रचंड पैसे कुठून मिळतात,’ असा सवालही केला.

”भाजपने 104 विधानसभा जागा जिंकल्या आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा आहे. ते शक्य नव्हते म्हणून ते असे मार्ग शोधत आहेत,” असे ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते रमेश जार्किहोळी यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. याबाबत विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले, की त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकलेला नाही.

दरम्यान, सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्यात वाद असल्याची चर्चा आहे. सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी सुचविलेल्या नावांना परमेश्वर यांनी विरोध केला आहे. तसेच जार्किहोळी यांनी दिल्लीत ज्येष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन राज्यातील सरकार पाडण्याविषयी चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सिद्धरामय्यांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

Leave a Comment