आयसीसीने स्मृती मानधनाला यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले

smriti-mandhana
मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला गौरविले आहे. नुकताच वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार जाहीर करण्यात आला. स्मृतीला यासह सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तसेच २०१८च्या आयसीसीच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही २२ वर्षीय स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.

वर्षभरात स्मृतीने १२ एकदिवसीय सामन्यात ६७च्या सरासरीने ६६९ धावा केल्या. तर २५ टी२० सामन्यांत सुमारे १३०च्या स्ट्राईक रेटने ६२२ धावा लगावल्या. भारतीय महिला संघाने स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला वर्ल्ड कप टी२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेत तिने ५ सामन्यांत १२५.३५च्या स्ट्राईक रेटने १७८ धावा केल्या होत्या. आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीतही ती अनुक्रमे चौथ्या व १०व्या स्थानी आहे.

याशिवाय, आज महिला क्रिकेटमधील आयसीसी एकदिवसीय संघ आणि आयसीसी टी-२० संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषणा केली. सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड या संघामध्ये महिला क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांमधून केली जाते. याबाबत अभिमानाची बाब म्हणजे भारताला यंदा टी-२० विश्वविजेतेपद मिळवता आले नसले, तरी आयसीसी Women’s T-20 Team of the Year 2018 च्या कर्णधारपदाचा मान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला देण्यात आला आहे. तर सुझी बेट्स हिच्याकडे आयसीसी Women’s ODI Team of the Year 2018 चे नेतृत्व देण्यात आले आहे.

Leave a Comment