एका लग्नाची गोष्ट – 72 वर्षांनंतर झाली पती-पत्नीची भेट

kerala
नात्याला काळ-वेळेची बंधने नसतात, हे वाक्य खरे करणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे लग्नानंतर केवळ काही दिवसांनी विभक्त झालेल्या एका पती-पत्नीची तब्बल 72 वर्षांनंतर भेट झाली. या दोघांचेही अन्य जोडीदारांशी लग्न झाले होते आणि त्यांच्या मुलाबाळांनी त्यांची भेट घडवून आणली, हे विशेष!

शारदा आणि नारायणन नंबियार असे यातील पत्नी व पतीचे नाव आहे. सध्या शारदा या 86 वर्षांच्या तर नारायणन नंबियार हे 90 वर्षांचे आहेत. या दोघांचा विवाह 1946 साली झाला होता. नारायणन यांच्या मामाच्या मुलगी असलेल्या शारदा या त्यावेळी केवळ 14 वर्षांच्या होत्या. मात्र त्याच वर्षी किसान सभा आणि कम्युनिस्ट पार्टीच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल नारायणन तुरूंगात जावे लागले. त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर शारदाच्या कुटुंबियांनी त्यांचे दुसरे लग्न लावून दिले. यानंतर ते एकमेकांना भेटले नव्हते.

त्याच्या वडिलांना तुरूंगात गोळ्या घालण्यात आल्या. त्या गोळीबारात नारायणनही जखमी झाले. त्यांच्या शरीरात आजही एक गोळी आहे. 1954 मध्ये त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले आणि त्यांना सात मुले झाली.

दोघांच्याही कुटुंबातील काही सदस्यांना हे दोघेही जीवंत असल्याचे कळाल्यावर त्यांनी त्यांची भेट घडवून आणली. शारदा यांचे मुलगे के. के. भार्गवन यांनी आपल्या आईचे पहिले पती हयात असल्याचे कळाले, तेव्हा त्यांना भेटविण्याचे त्यांनी ठरविले. भार्गवन यांच्या कोडलूर येथील निवासस्थानी ही भेट घडली.

नारायणन यांना सालेम जेलमध्ये त्यांच्या वडिलांसोबत ठेवण्यात आले होते.

Leave a Comment