द. आफ्रिकेचा डुआन ओलीवर पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकला

Duanne-Olivier
नवी दिल्ली – सुपर स्पोर्ट पार्क मैदान येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आफ्रिकेने भेदक गोलंदाजीच्या जीवावर पाकला ६ गड्यांनी मात दिली. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डुआन ओलीवर या सामन्यातील खरा हिरो ठरला. संपूर्ण सामन्यात त्याने ११ गडी बाद केले. त्याने पहिल्या डावात ६ गडी बाद केले होते.

१८१ धावांवर पाकिस्तानचा पहिला डाव संपुष्टात आला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही मोठी धावसंख्या उभारली नाही, तरीही या सामन्यात त्यांनी बाजी मारली. पहिल्या डावात आफ्रिकेने २२३ दाव केल्यामुळे त्यांना अवघ्या ४३ धावांची आघाडी मिळाली. ओलीवरने दुसऱ्या डावात पुन्हा भन्नाट स्पेल टाकत ५ गडी बाद करुन पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकला त्यांच्या धारदार गोलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांचा दुसरा डाव १९० धावांवर आटोपला.

१४९ धावांचे सोपे आव्हान चौथ्या डावात आफ्रिकेला मिळाले. आफ्रिकेने प्रतिउत्तरात ४ गडी गमावून हे आव्हान गाठले. हाशिम अमलाने नाबाद ६३ धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. त्यात ११ चौकारांचा समावेश होता. सलामीचा फलंदाज डीन एल्गारने ५० धावा काढून त्याला सुरेख साथ देत संघाला विजय मिळवून दिला. एडिन मार्कराम स्वस्तात बाद झाल्यावर दुसऱ्या गड्यासाठी अमला आणि एल्गारने ११९ धावांची निर्णायक भागीदारी केली. एल्गारचा बळी शान मसूदने घेतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या थेयुनिस डे ब्रून (१०) फाफ डु प्लेसिस(०) धावसंख्येवर बाद झाले. अमला आणि टेम्बा बावुमा (नाबाद १३) यांनी अधिक पडझड होऊ न देता संघाला विजय मिळवून दिला.

Leave a Comment