कसोटी क्रिकेटमध्ये कागिसो राबाडाच्या नावावर एका विक्रमाची नोंद

Kagiso-Rabada
सेंचुरियन – दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीत पाकचा दारुण पराभव झाला असून कागिसो राबाडाने या सामन्यात दोन्ही डावात मिळून ६ बळी घेत नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०.०७ च्या सरासरीने त्याने ५२ गडी बाद करत क्रिकेटविश्वात आपला दबदबा कायम ठेवला. तो अशी कामगिरी करणारा पहिलाच दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज बनला आहे.

सलग दुसऱ्या वर्षात राबाडाने ५० पेक्षा बळी घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने गेल्या वर्षात ११ कसोटीत ५७ बळी घेतले होते. त्याला २०१६ साली ५० कसोटी बळी पूर्ण करण्यासाठी ४ बळी कमी पडले. त्यावर्षी त्याने २३.३४ च्या सरासरीने ४६ गडी बाद केले. आतापर्यंत राबाडाच्या नावावर १५१ बळीची नोंद आहे.

राबाडाच्या पाठोपाठ श्रीलंकेचा फिरकीपटू दिलरुवान परेराने ५० गडी बाद केले तर, नाथन लॉयन ४९ गडी बाद केले. ते सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. पहिला कसोटी सामना आफ्रिकेने ६ गडी राखून जिंकला. यात डुआन ओलीवर आणि राबाडा यांनी भेदक गोलंदाजी करत पाकला दोन्ही डावात अडचणी आणले. त्यामुळे पाकला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. परिणामी आफ्रिकेने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Leave a Comment