तळाच्या फलंदाजांनी भारताचा विजय लांबवला; ऑस्ट्रेलिया चौथ्या दिवसअखेर ८ बाद २५८

team-india
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर ८ बाद २५८ धावांपर्यंत मजल मारली. आता विजयासाठी ऑस्ट्रेलियाला १४१ धावांची आवश्यकता आहे, तर सामन्याच्या अंतिम दिवशी भारताला केवळ दोन बळींची आवश्यकता आहे. भारताकडून जाडेजाने सर्वाधिक ३ बळी टिपले. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यात एकमेव अर्धशतक झळकवणारा पॅट कमिन्स (६१*) अजूनही मैदानात तग धरून आहे.

दुसरा डाव भारताने घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आला. पहिल्या डावात ८ धावांवर बाद झालेला सलामीवीर फिंच दुसऱ्या डावात केवळ ३ धावाच करू शकला. पहिल्या डावातील धडाका बुमराहने दुसऱ्या डावातही कायम ठेवला आणि ऑस्ट्रेलियाला फिंचच्या रूपाने पहिला धक्का दिल्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा हॅरिस फॉरवर्ड शॉर्ट लेगला झेलबाद झाला. त्याने १ चौकार लगावत १३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ४४ धावांच्या मोबदल्यात २ गडी गमावले. त्यानंतर आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात ख्वाजा ३३ तर शॉन मार्श ४४ धावांवर बाद झाला. शॉन मार्शनंतर मिचेल मार्श देखील फटकेबाजीच्या नादात १० धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची चहापानपर्यंत अवस्था ५ बाद १३८ अशी झाली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला ट्रेव्हिस हेड ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन थोड्या वेळाने २६ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ मिचेल स्टार्क त्रिफळाचीत झाला.

तत्पुर्वी भारताची तिसऱ्या दिवसअखेर अवस्था ५ बाद ५४ अशी झाली होती. त्या धावसंख्येवरून आजच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. पण म्हणाव्या तशा जास्त धावा भारताला जमवता आल्या नाहीत. आधी अग्रवाल (४२), नंतर जाडेजा (५) पाठोपाठ पंत (३३) बाद झाल्यामुळे भारताने दुसरा डाव ८ बाद १०६ वर घोषित केला आणि यजमान ऑस्ट्रेलियाला ३९९ धावांचे लक्ष्य दिले. पहिल्या डावात तब्बल ७२ धावा देत ३ बळी घेतलेल्या पॅट कमिन्सने दुसऱ्या डावात अप्रतिम कामगिरी केली. कमिन्सचे केवळ २७ धावांत ६ बळी टिपले. ही त्याची कसोटी कारकिदीर्तील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Leave a Comment