फुल्ल टू धम्माल ‘सिम्बा’

simmba
करण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित सिम्बा चित्रपट आज अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोहित शेट्टीने आपल्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रामणिक प्रयत्न केला. चित्रपट पाहिल्यानंतर तो प्रयत्न यशस्वी झाला आहे असेच म्हणावे लागेल.

सिम्बा संग्राम भालेराव (रणवीर सिंह) मध्ये रोहित शेट्‌टीच्या ‘आता माझी सटकली’ फेम बाजीराव सिंघम (अजय देवगण) ची झलक थेट दिसते. एकीकडे सिंघम, एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर होता. तर दुसरीकडे सिम्बा मात्र एक भ्रष्ट पोलीस असल्याचे दाखवले गेले आहे. बेईमानी करून त्याला जास्त पैसे कमवायला काहीही चुकीचे वाटत नाही.

रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटातील नायकांपेक्षा ‘सिम्बा’ थोडा वेगळा आहे. तो आत्मकेंद्री आहे. त्याच्यावर पोलिसांचा यूनिफॉर्म एकदम सूट करतो. तो खूप टवाळखोर आणि चेष्टा-मस्करी करणारा दाखवला आहे. त्याचा सेंस ऑफ ह्यूमर मुळीच चांगला नाही. स्वतःला आणि पोलिसांच्या कामाला तो गांभीर्याने घेत नाही. रोहित शेट्‌टीला अशा आगळ्यावेगळ्या भूमिकेत रणवीर सिंहच्या रूपात परफेक्ट कास्टिंग मिळाले आहे. आपल्याला सिंघमच्या आवाजात अनाथ मुलगा ‘सिम्बा’ची कहाणी ऐकवली जाते. त्यातून ‘सिम्बा’ एक भ्रष्ट आणि निर्दयी माणूस का बनला हे सांगितले जाते. तारुण्यात सिम्बा पदार्पण करतो आणि तो पोलीस अधिकारी बनतो. मिरामार पोलीस स्टेशनमध्ये त्याची बदली होते. तो येथे त्याच्याआधी भ्रष्ट असल्याची ख्याती पोहोचते. तो येथील लोकल गुंडांकडून आपला ‘कट’ घेण्यात यशस्वी होतो. दरम्यान त्याची शेजारी असलेल्या प्रिया (सारा खान) च्या तो प्रेमात पडतो. एक भीषण गुन्हा याचकाळात त्याच्या कार्यक्षेत्रात घडतो, ज्यामुळे तो एक चांगला पोलीस अधिकारी बनतो आणि आरोपींच्या मागावर निघतो.

सर्व गोष्टी रोहित शेट्‌टीच्या चित्रपटामध्ये कायम लाऊड असतात. कायम प्रेक्षकांना फुल मसाला आणि पैसा वसूल चित्रपट तो देत असतो. सिक्स पॅक असलेला हीरो जो फ्रेमबाहेर आणि आतमध्ये स्लो मोशनमध्ये चालतो, दमदार डायलॉग जे लक्ष वेधून घेतात आणि जुन्या काळातील हीरोंचे अॅक्शन सीन त्याच्या चित्रपटात बघायला मिळत असतात. या गोष्टींत रोहितचा हातखंडा आहे. त्याच्या याही चित्रपटात हे सर्व आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याचा अंदाज प्रेक्षक सहज बांधू शकतात.

बलात्कारासारख्या गंभीर विषयाला रोहित शेट्टीने उचलून धरले पण या विषयाला मसाला चित्रपटाची फोडणी देऊन तो फसला. चित्रपटाचा फर्स्ट हाफ नाटकासारखा वाटतो, पण सेकंड हाफ गती पकडतो, त्यामुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतात.

चित्रपटातील भूमिकेला रणवीर सिंहने शंभर टक्के न्याय दिला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्क्रिनवर रणवीरला बघताना मजा येते. सुरुवातीला एक भ्रष्ट आणि पोलीसांचे काम गांभीर्याने न घेणारा अँग्री मॅनमध्ये कसा बदलतो, हे त्याने अचुक टिपले आहे. त्याच्या अवतीभोवती कलाकारांची तगडी फौज आहे, पण तरीदेखील रणवीरने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

साराकडे चित्रपटात सुंदर दिसणे आणि एका डान्स सिक्वेन्सव्यतिरिक्त करण्यासारखे दुसरे काहीच नाही. हा चित्रपट तिने कोणता विचार करुन स्वीकारला हेच कळत नाही. डॉनच्या रुपात सोनू सूद शोभून दिसला. त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आशुतोष राणा सिम्बाचे हेड कॉन्सटेबल बनले असून काही ठिकाणी त्यांनी दमदार अभिनय केला, तर कुठे ते ओव्हर अॅक्टिंग करताना दिसले.

चित्रपटात अजय देवगणची धमाकेदार एंट्री बघायला मिळते. प्रेक्षकांसाठी अक्षय कुमारचाही कॅमिओदेखील सरप्राइज पॅकेज आहे. अक्षयला चित्रपटात बघून रोहित सिक्वेलच्या तयारीत असून अक्षय मेन लीडमध्ये असेल, असा अंदाज बांधता येतो. रोहितने सामाजिक संदेश देणारा चित्रपट बनवण्यापेक्षा त्याचा हातखंडा असलेल्या मसाला चित्रपटाकडेच लक्ष दिले असते, तर योग्य ठरले असते, असे हा एकंदरीत चित्रपट बघून वाटते.