या बाजारात चिकन-पोर्कपेक्षा उंदरांना जास्त भाव…!

rat
उपद्रवी प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंदराला सर्वात जास्त भाव मिळतो, असाही एक बाजार आहे आणि गंमत म्हणजे तो चक्क भारतात आहे.

हे गाव भूतानच्या सीमेवर आहे. आसाम राज्यातील कुमारीकाटा या गावात ही बाजारपेठ दर रविवारी भरते. या गावात भरणाऱ्या बाजारात उंदीर विकत घेण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांची गर्दी उसळते. शिवाय स्थानिक शेतांतून पकडलेले रानटी उंदीर ही येथील खासियत आहे. चिकण आणि डुकराच्या मांसापेक्षाही येथे मिळणारे जीवंत उंदीर लोकप्रिय आहेत. मात्र येथे भाजलेले उंदीरही विकण्यात येतात.

या उंदरांना स्थानिक लोक उकळून सोलतात आणि नंतर मसालेदार रश्श्यात त्याची भाजी करतात. उंदरांनी शेतांचे नुकसान करू नये, यासाठी स्थानिक शेतकरी त्यांची शिकार करतात. आसामच्या प्रसिद्ध चहाच्या बागांमधून काम करणाऱ्या गरीब आदिवासींसाठी हे उंदीर म्हणजे उत्पन्नाचा एक मौल्यवान स्रोत बनले आहेत. हिवाळ्याच्या महिन्यांत चहाची खुडणी मंदावते तेव्हा आदिवासी भाताच्या शेतांमध्ये उंदरांना पकडण्यासाठी जातात.

या बाजारात एक किलो उंदराच्या मांसाला सुमारे 200 रूपयांचा भाव मिळतो. चिकन आणि पोर्कही याच भावाने विकले जाते. अलीकडील वर्षांत या प्रदेशात उंदरांची संख्या वाढत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याचे एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment