आगामी निवडणुकीत तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देणार राष्ट्रवादी : सुप्रिया सुळे

supriya-sule
पुणे : सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यात आता तृतीयपंथी व्यक्तीला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीने विचार सुरु केला आहे. त्यानुसार तृतीयपंथी व्यक्तीला राज्यात आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

नुकतेच तृतीयपंथींच्या संदर्भात ट्रान्सजेंडर पर्सन्स (अधिकारांचे सरंक्षण) विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आणि ते मंजूर करण्यात आले. तृतीयपंथी बिल आणि सरोगसी बिल लोकसभेत केंद्रातील सत्ताधारी फार अनुकूल नसताना आम्ही पास करून घेतली, असा दावाही खासदार सुळे यांनी यावेळी केला. पुण्यात अठराव्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उदघाटन झाले. हे भाष्य त्यावेळी त्यांनी केले.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातर्फे एकातरी तृतीयपंथी व्यक्तीला तिकीट दिले जाईल. मी तसा आग्रहच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणार असल्याचे जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात केले. दरम्यान, राष्ट्रवादीने प्रथम महिला आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता. तो तडीस नेला. आता तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. पण राष्ट्रवादीकडून प्रत्यक्षात अशा व्यक्तीला उमेदवारी मिळणार का, याची उत्सुकता आहे.