तिसरा कसोटी सामना – ऑस्ट्रेलिया पाठोपाठ टीम इंडियाची दाणादाण

cricket
मेलबर्न – कर्णधार विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीला उतरण्याचा निर्णय भारतीय फलंदाजांनी एकापाठोपाठ परतीचा मार्ग धरत चुकीचा ठरवला आहे. दुसऱ्या डावात भारताची 54 धावांवर ५ बाद अशी बिकट अवस्था झाली असून भारतीय फलंदाजांची पॅट कमिन्सने टिच्चून मारा करत दाणादाण उडवली. एकहाती कमिन्सनेच भारताचे चारही बळी मिळवले तर हेजलवूडने रोहित शर्माची विकेट घेतली.

असे असले तरी भारताकडे पहिल्या डावातील ४४३ धावांच्या जोरावर अजूनही ३३६ धावांची आघाडी आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. यातील पहिल्या डावातील शतकवीर पुजारा आणि कोहलीला तर भोपळाही फोडता आला नाही. मयंक अगरवाल २३ धावांवर नाबाद असून रोहित शर्मा ५ धावांवर बाद झाल्यानंतर त्याच्यासोबत रिषभ पंत फलंदाजीला उतरला आहे.

तत्पूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया विरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. भारताने बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांवर गुंडाळला. ३३ धावांत जसप्रित बुमराहने ६ बळी घेत करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाला माफक धावसंख्येत गुंडाळल्यानंतर फॉलोऑन देणे शक्य असतानाही कर्णधार कोहलीने भारतीय फलंदाजांना पुन्हा फलंदाजीसाठी उतरवले आहे.

भारतीय गोलंदाजांनी आज सकाळच्या पहिल्या सत्रात धारदार गोलंदाजी करत ऑस्ट्रलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले. ऑस्ट्रलियाच्या आघाडीच्या चार फलंदाजांना पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी माघारी पाठवल्यानंतर कर्णधार टीम पेनने पॅट कमिन्ससह थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद शमीने कमिन्सचा त्रिफळा उडवत त्यांच्या चिवट भागीदारीला खिंडार पाडले. यानंतर ऑस्ट्रलियाचे शेपूट बुमराहने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर लवकरच गुंडाळले.

आज सकाळी इशांत शर्माने सलामीवीर अॅरॉन फिंचला बाद करत ऑस्ट्रलियाला पहिला धक्का दिला. रविंद्र जडेजानेही आपल्या फिरकीची कमाल दाखवत उस्मान ख्यवाजा आणि मिचेल मार्शला परतीचा रस्ता दाखवला. बुमराहच्या ६ बळींसोबतच शमी आणि इशांत शर्मानेही प्रत्येकी १ बळी मिळवला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारत दुसऱ्या डावात किती धावा करून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment