तिसरा कसोटी सामना – पुजाराचे शतक, दुसऱ्या दिवसाखेर सामन्यावर टीम इंडियाची मजबूत पकड

team-india
मेलबर्न – भारताने पुजारा, कोहली आणि रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर सामन्यावर पकड मिळवली आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर कर्णधार विराट कोहलीने ७ बाद ४४३ धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाखेर सावध फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी ४३५ धावांनी फिछाडीवर आहे. अनुभवी चेतेश्वर पुजाराने भारताकडून (१०६) शतकी खेळी करत पाया रचला. पदार्पणातच सलामीवीर मयंक अग्रवालने (७६) अर्धशतकी खेळी करत छाप सोडली. कर्णधार विराट कोहलीने ८२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. कसोटीत पुनरागमन करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने (६३) नाबाद अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले.

भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी भारताने मोठी धावसंख्या उभारली. भारताने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एकही गडी न गमावता २ बाद २७७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली आणि पुजारा बाद झाल्यानंतर मुंबईकर रहाणे-रोहित जोडीने मोर्चा सांभाळला. रहाणे (३४) बाद झाल्यानंतर रोहितने पंतच्या साथीने धावसंख्या ४०० पार पोहचवली. अखेर पंत ३९ धावांवर बाद झाला. पंतनंतर खेळपट्टीवर आलेला जाडेजाही लगेच माघारी परतला. जाडेजा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करून कांगारूंना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने ३ तर स्टार्कने दोन गडी बाद केले. हेजलवूड आणि लिओनला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद ८ धावा केल्या आहे.

Leave a Comment