बहुचर्चित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीज

anupam-kher
आज अखेर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावरच आधारित आहे.

तत्कालिन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे काम करत होते. त्यांचे पंतप्रधान होणे हा केवळ योगायोग होता. मोकळेपणाने काम करण्याची त्यांना मुभा नव्हती. राहुल गांधी यांची कारकिर्द उभी करण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला अशा आशयाचा हा ट्रेलर आहे.

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर येत असलेल्या या चित्रपटामुळे राजकारणात कोणत्या पक्षाला फायदा होणार याची चर्चा आता ट्रेलरमुळे सुरू होऊ शकते. काँग्रेसचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांनी अशा वादग्रस्त चित्रपटांना आक्षेप घेण्याची भूमिका घेतलेली नाही. मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची नावे या चित्रपटात उघडपणे घेतली गेली असल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून काही वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट २१ डिसेंबर २०१८ला हा प्रदर्शित होईल. विजय रत्नाकर गुत्ते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.