तिसरा कसोटी सामना – भारताच्या दिवसअखेर २ बाद २१५ धावा

team-india
मेलबर्न – भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व राखले. भारताने नवोदित मयंक अग्रवाल (७६) आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा (६८*) यांच्या अर्धशतकाच्या बळावर पहिल्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली. संघाबाहेर लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना करून मयंक-विहारी हा नवा सलामी जोडीचा प्रयोग भारताने केला होता. काही अंशी हा प्रयोग सफल ठरला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने २ बळी टिपले. पुजाराबरोबर सध्या कर्णधार विराट कोहली ४७ धावांवर नाबाद आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी भारताने स्वीकारली. सलामीला आलेल्या हनुमा विहारीने ६६ चेंडूमध्ये ८ धावांची चिवट खेळी केली. तर मयंक अग्रवालने पदार्पणातच दमदार कामगिरी करताना ७६ धावांची खेळी केली. ४ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असल्यामुळे दोनही संघ बॉक्सिंग डे कसोटी जिंकून निर्णायक आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. मयंक अग्रवाल याला या सामन्याच्या माध्यमातून संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचा हा पदार्पणाचा सामना असल्याने त्याच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाल्याने त्याच्यावरही चांगला खेळ करण्याची जबाबदारी आहे.

Leave a Comment