स्वच्छता विक्रमासाठी गिनीज बुक नोंद करणार प्रयागराज कुंभ

prayag
येत्या १५ जानेवारी पासून सुरु होत असलेल्या जागतिक कीर्तीचा कुंभमेळा स्वच्छतेचे रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी तसा अर्ज केला गेला आहे. ३ मार्च पर्यंत सुरु राहणाऱ्या या मेळ्यात देशविदेशातून १२ ते १५ कोटी लोक उपस्थित राहतील असा अंदाज असून कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

उत्तरप्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह या संदर्भात माहिती देताना म्हणाले. इतक्या प्रचंड गर्दीत स्वच्छता राखणे हे मोठे आव्हान आहे आणि आम्ही ते स्वीकारले आहे. या मेळ्यात स्वच्छता राखून विक्रम नोंदविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून हा विक्रम गिनीज बुक मध्ये नोंदला जावा यासाठीची कारवाई सुरु झाली आहे. कुंभमेळ्याच्या समाप्तीनंतर या संदर्भात नोंद केली जाईल.

tents
या ठिकाणी १ लाख २२ हजार ५०० स्वच्छतागृहे उभारली गेली असून २० हजाराहून अधिक सफाई कामगार नेमले गेले आहेत. जागोजागी कचरा पेट्या लावल्या गेल्या आहेत आणि अत्याधुनिक मशीन्सच्या सहाय्याने कचरा प्रबंधन केले जाणार आहे. गर्दी लक्षात घेऊन गंगा निर्मळ आणि स्वच्छ राहावी याकडे पूर्ण लक्ष पुरविले गेले आहे.

या मेळ्यात विविध ७० देशांचे प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. त्यात चीन व पाकिस्तानचा समावेश नाही. भाविकांना राहण्यासाठी अत्याधुनिक तंबू नगरी उभारली गेली असून तेथे सर्व सोयी सुविधा दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment