लातूर जवळ वसलेले एचआयव्ही, हॅपी इंडिअन व्हिलेज

hiv-ravi-
महाराष्ट्राच्या लातूर जवळ वसविले गेलेले एक गाव विशेष वेगळे असून याचे नाव एचआयव्ही म्हणजे हॅपी इंडियन व्हिलेज असे ठेवले गेले आहे. हे गाव मुख्यत: एचआयव्ही पॉझीटिव्ह असलेल्या लोकांसाठीच असून ते वसविले आहे मुळचे पत्रकार असलेल्या रवी बापटले यांनी. याची कहाणी मोठी भावनिक आहे.

पत्रकार म्हणून काम करत असताना रवी यांची भेट एचआयव्ही पॉझीटिव्ह असलेल्या एका मुलाबरोबर झाली. हे वर्ष होते २००७. या मुलाला गावातून बहिष्कृत करण्यात आले होते. या लोकांना आधार दिला पाहिजे याची जाणीव झालेल्या रवी यांनी लातूर जवळ असलेल्या हसेगाव येथील त्याच्या मालकीच्या जमिनीवर सेवालय आश्रम सुरु केला आणि एचआयव्ही पॉझीटिव्ह असलेल्या ज्या लोकांना घराबाहेर, गावाबाहेर काढले गेले आहे त्यांना तेथे आधार देऊन आश्रय दिला.

sevalay
आसपासच्या गावातून रवी यांच्या या कामाला खूप विरोध झाला पण रवीने माघार घेतली नाहीच पण आजूबाजूच्या लोकांना या रोगाची माहिती देण्याचे काम सुरु केले. एचआयव्ही पॉझीटिव्ह असणे म्हणजे एड्स नव्हे, याचा संसर्ग होत नाही हे समजावून दिले आणि या लोकांना एकटे सोडणे अधिक धोक्याचे होईल हे सामावले. त्यांनी त्यासाठी हे स्वतंत्र गावच वसविले. सध्या येथे १८ वर्षाखालील ५० एचआयव्ही पॉझीटिव्ह मुले आणि त्यापेक्षा मोठी २८ माणसे राहत आहेत. मोठ्या लोकांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते तर लहान मुले शाळेत शिकतात. या कामासाठी रवी यांनी कोणत्याची प्रकारची सरकारी मदत घेतलेली नाही.

या गावातील रहिवासी सकाळी एकत्र व्यायाम करतात. नंतर मुले शाळेत जातात तर मोठे प्रशिक्षण घेतात. या लोकांच्या चेकअप साठी डॉक्टर येतात. विशेष म्हणजे गेल्या ११ वर्षात येथे एकही मुल मृत्युमुखी पडलेले नाही. रवी सांगतात माझी संस्था मोठी व्हावी असे मला मुळीच वाटत नाही उलट ती बंद व्हावी अशीच माझी इच्छा आहे. कारण भविष्यात असा समाज असावा ज्यात कुठलेच मुल एचआयव्ही पॉझीटिव्ह असू नये आणि असले तर त्यांच्य्सोबत कोणताही भेदभाव न होता सर्वाना एकत्र राहता यावे.

Leave a Comment