10 टक्क्यांनी कमी होणार शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम : प्रकाश जावडेकर

praksah-javadekar
पुणे : अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांवरील वाढता भार कमी करण्यासाठी अभ्यासक्रम 10 टक्क्यांनी कमी केला जाणार आहे. तसे आदेश सरकारने दिल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. जावडेकर पुण्यातील लवळे येथील मालपाणी ग्रुपच्या ध्रूव या शाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

सरकारने दहा टक्के शालेय अभ्यासक्रम कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तर 20 टक्के अभ्यासक्रम पुढील वर्षी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. टप्याटप्याने हा अभ्यासक्रम येत्या काळात कमी केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

सरकारने पहिली, दुसरीचा घरचा अभ्यासही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारचा पुस्तकांची संख्या कमी करण्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा खेळ आणि साहित्यिक कार्यक्रमात सहभाग वाढावा, या हेतूने निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकरांनी म्हटले आहे.

मुलांनी अभ्याक्रमात न गुंतता त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, देशातील शाळांना याकरता पाच हजारापासून खेळाचे सामान खरेदी करण्याकरिता आर्थिक तरतुद केली आहे. सर्व शाळांना त्यासाठीची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पुस्तकांची संख्या कमी केली जाईल, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.