पुणेकर सायकलपटू वेदांगीने १५९ दिवसात सायकलवरुन केली १४ देशांची सफर

vedangi-kulkarni
अवघ्या २० व्या वर्षी सर्वात कमी दिवसांत सायकलवर जगाची सफर करण्याचा मान पुण्याच्या वेदांगी कुलकर्णी या तरुणीने पटकावला आहे. तिने यामध्ये १४ देशांची सफर केली असून तिला त्यासाठी १५९ दिवस लागले. तिने यामध्ये सायकलवर २९,००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. जुलै महिन्यात वेदांगीने पश्चिम ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या पर्थ येथून आपल्या या मोहिमेची सुरुवात केली होती. तर तिने या मोहिमेचा शेवट ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या एका शहरात केला. याबाबत वेदांगी सांगते, दिवसाला मी ३०० किलोमीटर सायकल चालवायचे. मला या सर्व प्रवासादरम्यान माझ्या वाट्याला काही चांगले आणि काही वाईट अनुभव आले असेही वेदांगी म्हणाली.

तिचे बाबा तिच्या या अनोख्या सफरीबाबत म्हणाले, हे अवघड आव्हान जगभरात अतिशय मोजक्या लोकांनी पेलण्याचा प्रयत्न केला आहे. तर कमी वेळात ही सफर पूर्ण करणारी वेदांगी आशियातील पहिली खेळाडू ठरली आहे. ब्रिटनच्या ३८ वर्षीय जेनी ग्राहम यांनी सर्वात कमी दिवसांत सायकलवरुन पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. या सफरीसाठी जेनी यांना १२४ दिवस लागले होते. वेदांगीने आतापर्यंत अनेक सायकल चालवण्याचे अनेक विक्रम केले असले तरीही तिच्या नावावर असलेला हा एक मोठा विक्रम असल्याचे म्हटले जात आहे. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० यात्रा तिने एकटीने केल्या आहेत.

वेदांगीने मागील २ वर्षांपासून आताच्या पृथ्वी प्रदक्षिणेसाठी तयारी केली होती. तिला या जगप्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तिने त्यावर मात करत अवघ्या २० व्या वर्षी आपली ही सफर पूर्ण केली. कॅनडामध्ये तिच्या सायकलमागे एक कुत्रे लागला होता, मात्र त्यातून तिने स्वत:ची सुरक्षितरित्या सुटका करुन घेतली. तर रशियातील बर्फात तिला काही रात्री एकटीला काढाव्या लागल्या. तर स्पेनमध्ये चाकूचा धाक दाखवत तिला चोरट्यांनी लुटल्याचीही घटना घडली. सध्या लंडनमधील Bournemouth विद्यापीठातून वेदांगी स्पोर्टस मॅनेजमेंट विषयातील पदवी घेत आहे. आपले आईवडिल हेच आपली खरी ताकद आहेत असे वेदांगी सांगते.

Leave a Comment