नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मृतिचिन्ह असलेल्या १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना आज आपल्यात अटलजी नाहीत, अजूनही यावर विश्वास बसत नसल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाच्या मनात अटलजींबद्दल आदर आणि प्रेम असल्याचे ते म्हणाले. सत्तेसाठी वाजपेयींनी तत्वांशी कधीच तडजोड केली नाही, याचा दाखलाही दिला.
मोदींच्या हस्ते वाजपेयींच्या जयंती निमित्ताने १०० रुपयांचे नाणे जारी
अटलजींचे वक्तृत्वकौशल्य अतुलनीय होते. त्यांच्या एवढा प्रभावी वक्ता आजवर देशाच्या इतिहासात झालेला नाही. अटलजींनी पायाभरणी केलेला पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे मार्गदर्शन आमच्या पिढीच्या कार्यकर्त्यांना लाभले आम्ही याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, अरुण जेटली, महेश शर्मा, अमित शाह तसेच जेष्ठ नेते लालकृष्ण अडवानी या कार्यक्रमात देखील उपस्थित होते.
भारताचे बोधचिन्ह या नाण्याच्या समोरच्या बाजूला असून देवनागरी लिपीत ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले आहे. नाण्याच्या समोरील बाजूस अशोक स्तंभ कोरलेला असून त्याचबरोबर देवनागरी लिपीत ‘भारत’ तर रोमन लिपीत ‘इंडिया’ असे लिहिलेले आहे. राष्ट्रीय चिन्हाखाली १०० रुपये असे नाण्याचे मूल्य कोरलेले आहे. नाण्याच्या उलट्या बाजूला अटल बिहारी वाजपेयी यांचे चित्र असून त्याखाली त्यांचे नाव रोमन आणि देवनागरी लिपीत कोरलेले आहे. त्याचबरोबर १९२४ ते २०१८ हे दोन साल अनुक्रमे त्यांचे जन्मवर्ष आणि मृत्यूचेवर्ष म्हणून नाण्यावर लिहण्यात आले आहे.