…अखेर एका चहावाल्याने दिली ‘थकबाकी माफी’

tea
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात अनेक आंदोलने आणि चर्चा चालू असतानाच तमिळनाडूतील एखा चहावाल्याने मात्र थकबाकी माफी देऊन बाजी मारली आहे. या छोट्याशा चहावाल्याने आपल्या ग्राहकांची थकबाकी माफ केली असून त्याबद्दल त्याचे कौतुकही होत आहे.

तमिळनाडूत नुकत्याच आलेल्या गजा चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आणि महिला बचत गटांनी शेतीकर्ज व अन्य कर्जे माफ करण्याची मागणी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून त्यांना अद्याप उत्तर यायचे आहे. मात्र पुदुकोट्टै जिल्ह्यातील वंबन या गावातील दुकानदाराने मात्र गजा चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपल्या ग्राहकांचे कर्ज माफ केले आहे.

शिवकुमार असे या चहावाल्याचे नाव असून श्री भगवान चाय स्टॉल हा चहाचा स्टॉल तो चालवतो. गेल्या आठ वर्षांपासून आपल्या ग्राहकांची सर्व थकबाकी त्याने माफ केली आहे.

शिवकुमार याने आपल्या स्टॉलवर एक फलक लिहिला असून स्थानिक शेतकऱ्यांची गेल्या आठ वर्षांतील 18 डिसेंबरपर्यंतची थकबाकी माफ करत असल्याचे त्यावर लिहिले आहे. “मी गेल्या आठ वर्षांपासून चहाचे दुकान चालवत आहे. चक्रीवादळाने पीडित शेतकरी आपले चहा आणि उपाहाराचे पैसे देऊ शकत नाहीत, असे मला जाणवले. या पीडित लोकांना किमान काही प्रमाणात तरी मदत करावी म्हणून मी हे पाऊल उचलले,” असे त्याने स्थानिक माध्यमांना सांगितले.

Leave a Comment