ट्रायच्या नव्या नियमांमुळे टीव्ही प्रेक्षकांना कमी दरात घेता येणार केबल सेवा

trai
नवी दिल्ली – टीव्हीवर प्रसारण वाहिन्यांचे विविध चॅनेलचे एकत्रित पॅक घेऊन ग्राहकांना आतापर्यंत ज्यादा पैसे मोजावे लागत होते. पण आता ट्रायच्या नव्या नियमानुसार जे चॅनेल ग्राहकांना पाहायचे आहेत, तेवढेच शुल्क भरता येणार आहे. २९ डिसेंबर, २०१८ पासून प्रसारण वाहिन्यांचे नवे दर लागू होणार आहेत.

नव्या नियमानुसार झी एन्टरमेंट, सोनी पिक्चर नेटवर्क्स आणि स्टार इंडिया या प्रसारण वाहिन्यांनी त्यांचे दर जाहीर केले आहेत. झी इंटरटेनमेंटने ट्रायच्या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. ग्राहकांना नव्या दरामुळे चॅनेल निवडण्याच्या भरपूर संधी उपलब्ध होतील, असे झी इंटरटेनमेंटने म्हटले आहे. झीच्या हिंदी पॅकचा कमीत कमी मासिक दर ४५ रुपये आहे. झीचे ग्राहककेंद्रीत ६० पॅक आहेत. यामध्ये मनोरंजन, चित्रपट, बातम्या, संगीत आणि जीवनशैली अशा पॅकचा समावेश आहे.

तर ७ भाषांतील पॅक स्टार इंडियाने जाहीर केले आहेत. यामध्ये तमिळ भाषेसाठी २५ रुपये ते हिंदी भाषेसाठी ४९ रुपये असे मासिक दर आहेत. ३२ चॅनेलच्या वितरणाचे हक्क सोनी पिक्चर नेटवर्ककडे आहेत. सोनीच्या एचडी चॅनेलचा किमान मासिक दर ९० रुपये आहे.

याबाबात माहिती देताना दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) चेअरमन आर.एस.शर्मा यांनी सांगितले, की प्रसारण वाहिन्यांच्या नव्या दराची अंमलबजावणी होणार असल्यामुळे कमी दरात टीव्ही प्रेक्षकांना केबल सेवा घेता येणार आहे. जे चॅनेल पाहिजेत तेवढेच पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांच्या पैशात बचत होणार आहे. ट्रायने सर्व प्रसारण वाहिन्यांना चॅनेलच्या पॅकचे दर १ जानेवारीपासून ऑनलाईन जाहीर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Leave a Comment