‘असे’ मिळवा एसबीआयचे नवे ईएमव्ही एटीएम कार्ड

SBI
नवी दिल्ली – ३१ डिसेंबरपूर्वी नवे ईएमव्ही एटीएम कार्ड घेणे एसबीआयने ग्राहकांना बंधनकारक केले आहे. त्यासाठी बँकेत न जाता तुम्हाला एसबीआयच्या ऑनलाईन सेवेतूनही नवे एटीएम कार्ड मिळविता येणे शक्य आहे.

सर्व बँकांना मॅगस्ट्रीपचे एटीएम कार्ड बदलण्याच्या सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. ग्राहकांना त्यानुसार चिप असलेले नवीन एटीएम तथा डेबिट कार्ड घेणे बंधनकारक आहे. आरबीआयच्या सुचनेनुसार नवे डेबिट कार्ड ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत घेणे आवश्यक आहे. जुने डेबिट कार्ड त्यानंतर बंद केले जाणार आहे.

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. ग्राहकांना नवे एटीएम कार्ड घेण्याबाबत बँकेने एसएमएसद्वारे कळविले आहे. तुम्हाला मॅगस्ट्रीपचे एसबीआय कार्ड जर बदलायचे असेल तर कोणतीही फी त्यासाठी द्यावी लागणार नाही. तसेच वार्षिक शुल्क आकारणीतही एसबीआयकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे एटीएम कार्ड बदलू शकता.

नवे ईएमव्ही एटीएम कार्ड मिळविण्यासाठी एसबीआय बँकेच्या www.Onlinesbi.com या वेबसाईटवर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून अकाउंट उघडा. होम पेजवर E-Services टॅबवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर ATM card services ही लिंक दिसेल. त्यावरील Request ATM/Debit Card हा पर्याय निवडा. त्यानंतर नवे पेज दिसेल, त्यापैकी तुमचे सेव्हिंग अकाउंट कोणते आहे, ते निवडा. तुमचे एटीएम कार्डवरील नाव टाईप करुन तुम्हाला कोणते एटीएम कार्ड हवे आहे, तो पर्याय निवडा. त्यानंतर SUBMIT वर क्लिक करा.

सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ही सेवा फक्त चालू असते. सात दिवसात एसबीआय बँकेकडून घरपोच एटीएम कार्ड मिळते. जर तुम्हाला ऑनलाईन सेवेतून एटीएम कार्ड घेणे शक्य नसेल तर बँकेत फॉर्म भरून कार्ड मिळवू शकता. या पद्धतीनेही तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर सात दिवसात एटीएम कार्ड मिळते.

Leave a Comment