माजी आमदार शालिनी पाटील यांचे राज्यघटनेबाबत वादग्रस्त वक्तव्य

shalini-patil
सातारा – माजी आमदार शालिनी पाटील यांनी देशाची राज्यघटना ही कोणी एकट्या व्यक्तीने लिहिली नसल्याचे म्हटले आहे. आर्थिक निकषावरच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यांचा आज कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे सत्कार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होत्या.

एका व्यक्तीने भारतीय राज्यघटना लिहिलेली नाही. डॉ. राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. पंडित नेहरुंना महात्मा गांधींनी सांगितल्यामुळे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा समावेश घटना समितीमध्ये करण्यात आला. अनेक मान्यवर या समितीत होते. बाबासाहेबांचा मला अनादर करायचा नाही. मान्यवरांची मते ऐकून बाबासाहेबांनी घटना लिहिली. कोण्या एका व्यक्तीचे ते काम नसल्याचे त्या म्हणाल्या.

त्याचबरोबर सरकारने राफेल खरेदीची किंमत जाहीर केलीच पाहिजे. राफेलची किंमत मोदी का सांगत नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. कांदा रस्त्यावर फेकत आहेत. मोदींना मात्र ५ सुरक्षारक्षक आहेत. रात्री झोपले असतानाही त्यांच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक असतात. मोदी रोज परदेशी जात आहेत, त्यावेळसही सुरक्षारक्षक त्यांच्याबरोबर असतात. एका माणसाला एवढे सुरक्षारक्षक कशाला पाहिजेत? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

त्यांनी यावेळी मराठा आरक्षण, भाजप सरकारची कार्यपद्घती, याविषयावरही आपली मते मांडली. मराठा आरक्षणाचा विषय मी उपस्थित केला, म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकले. पण, आता आरक्षण मिळाल्यानंतर आम्हीच केले म्हणून शरद पवार आणि त्यांचे कुटुंब सांगत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले. यांनी केले तरी काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment