आरक्षणाचे गाजर दाखवून भाजपने मराठा-ओबीसींमध्ये तेढ निर्माण केले

prakash-ambedkar
अहमदनगर – भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देऊन आपला राजकीय स्वार्थ साधला पण त्यामुळे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण झाले आहे आणि संघर्ष निर्माण होणार असल्याचे मत बहुचन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ज्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले, तेच मराठा समाजाला लागू केले असल्यामुळे आमच्या ताटात वाटेकरी निर्माण झाल्याची, भीतीची भावना ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. त्यातून शांत असलेला महाराष्ट्र आता संघर्षांच्या उंबरठय़ावर उभा राहिलेला दिसेल, आरक्षणातून निर्माण झालेली ही कटुता निवडणुकीतून बाहेर पडलेली दिसेल, असेही त्यांनी पुढे म्हटले.

अ‍ॅड. आंबेडकर नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषदे’साठी येथे आले होते, ते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. सरकारने मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या गायकवाड समितीचा अहवाल जाहीर करायला हवा, श्रीमंत मराठा किती व गरीब मराठा किती याची टक्केवारी त्यातून स्पष्ट होईल, लोकशाहीत कोणताही अहवाल गोपनीय नसतो, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकेल की नाही, याबद्दल आपण साशंक असल्याचे सांगून आंबेडकर म्हणाले, भाजपचे केंद्रात व राज्यात सरकार असल्यामुळे ७० टक्के आरक्षण राज्यात लागू केल्यास मराठा समाजाचे आरक्षण टिकेल, असा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांना दिला होता, पण तो त्यांनी स्वीकारला नाही.

आपले आरक्षण १६ टक्क्य़ांच्या मर्यादेत राहील, याकडे मराठा समाजानेही लक्ष द्यावे, २७ टक्क्य़ांमध्ये अडकू नये, परंतु दुर्दैवाने मराठा समाजातील नेत्यांमध्ये तेवढे समजून सांगण्याची हिंमत नाही, दोन ताटे वगळी ठेवण्याची भूमिका मराठा नेते घेत नाहीत तोपर्यंत न्यायालयात याचिका दाखल होत राहतील, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment