व्यापाऱ्यांनी घेतला राजकीय पक्षांच्या ‘बंद’मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय

KTM
केरळ – केरळमधील व्यापाऱ्यांनी बंदमुळे कोट्यावधींचे आर्थिक नुकसान होत असल्याने कोणत्याही राजकीय पक्ष किंवा त्यांच्याशी संबंधित संघटनांच्या बंद किंवा संपात यापुढे सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या व्यापारी संघटनांनी 2019 हे वर्ष बंदविरोधी वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

केरळमध्ये गेल्या दोन महिन्यात तीन वेळा बंदची हाक देण्यात आली. व्यापारी, वाहतूक व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायांना याचा फटका बसला. आता केरळमधील व्यापारी बंदविरोधात एकत्र आले आहेत. नुकतीच केरळ ट्रॅव्हल मार्ट (केटीएम) तर्फे एक बैठक घेण्यात आली. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या 29 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. केरळमधील पर्यटनाला बंदचा सर्वाधिक फटका बसत असून किमान 200 कोटी रुपयांचे नुकसान या बंदमुळे एका दिवसात होते, असे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

यापुढे पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होणार नाही. काही संघटनांनी 8 आणि 9 जानेवारी रोजी केरळमध्ये बंदची हाक दिली आहे. पण या बंदला आमचा विरोध असेल, असे त्यांनी सांगितले. कोझिकोड येथे केरळ व्यापारी व्यावसायिक एकोपा समितीची बैठक पार पडली. 36 व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष टी नाझीरुद्दीन म्हणाले, सर्व दुकाने भविष्यात बंदच्या काळात सुरु असतील. बस आणि ट्रकही रस्त्यावर येतील आणि या निर्णयाची माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली आहे.

Leave a Comment