आता रोबोटच्या हवाली रेल्वेगाडय़ांची देखभाल आणि दुरुस्ती !

Robot
नागपूर : दिवसागणिक ‘रोबो’ अर्थात यंत्रमानवाचे कार्यक्षेत्र विस्तारत असून आता तर चक्क रोबोला रेल्वेगाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसारख्या कठीण कामासाठीही तैनात केले जाणार आहे. हा रोबो नागपूर रेल्वेने डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी विकसित केला असून गाडीच्या चाकापासून ते डब्याच्या आतील, बाहेरील कानाकोपऱ्याचे छायाचित्र आणि चित्रफिती तो उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यावर नियंत्रण कक्षातून नियंत्रण ठेवून त्याची दुरुस्ती कामात मदत घेतली जाईल. नागपूर रेल्वेस्थानक असा प्रयोग करणारे देशातील पहिले स्थानक ठरले आहे.

रेल्वेडब्यांची विशिष्ट अंतराचा प्रवास झाल्यानंतर देखभाल-दुरुस्ती केली जाते. स्थानकावर त्यासाठी पीट लाईनची व्यवस्था असते. आता या पीट लाईनवर ‘उत्साद’ नावाचा रोबो सज्ज राहणार आहे. सध्या पीट लाईनवर गाडी आल्यानंतर यांत्रिक विभागाचे कर्मचारी डब्यांचे नटबोल्ट तपासतात. हे काम आता रोबोच्या हवाली करण्यात आले आहे. रेल्वे डब्यांचे नटबोल्ट तपासण्यात हा रोबो कर्मचाऱ्यांना मदत करेल.

एचडी कॅमेरा तसेच विविध प्रकारचे सेंन्सर या रोबोमध्ये बसवले आहेत. रोबोमध्ये बसवलेल्या एच.डी. कॅमेऱ्यामुळे डब्याच्या आतील सुटय़ा भागांचे छायाचित्र व व्हिडीओ वाय-फायच्या माध्यमातून नियंत्रण कक्षात पाहता येतील. नियंत्रण कक्षातील अभियंते ते अँड्राईड अ‍ॅपच्या मदतीने नियंत्रित करतील. या कॅमेऱ्याला कोणत्याही कोनात सेट केले जाऊ शकते. तसेच प्राप्त छायाचित्र मोठे करून बघितले जाऊ शकते.

Leave a Comment