म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचे निलेश राणेंना प्रत्युत्तर

Uday-Samant
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कोकणातील स्थानिक नेत्यांवर माजी खासदार निलेश राणे हे टीका करत आहेत. राणे यांनी गुरुवारीच म्हाडाच्या घरसोडतीमध्येही घोळ असल्याचा आरोप केला. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी यावर राणेंना प्रत्युत्तर देत राणेंच्या तोंडाला लागणे आमच्या संस्कारात बसत नसल्याचे सांगितले. तसेच म्हाडाची घरसोडत पारदर्शक असल्याचेही स्पष्ट केले.

खासदार निलेश राणे यांची टीका कोकणच्या लोकांसाठी काही नवीन नसल्यामुळे सारखे सारखे त्यांना उत्तर देणे म्हणजे आम्ही रिकामे आहोत, असा त्याचा अर्थ होतो, असा टोमणा सामंत यांना लावला. हे रोज चालू राहणार असून एकदा उदय सामंत झाला, की मग विनायक राऊत, भास्कर जाधव, दीपक केसरकर असे सर्वांवर टीका करत बसायचे. आम्हाला कामे आहेत. ही लॉटरी पारदर्शक असल्यामुळे यात काही होण्याचा प्रश्नच नाही. काय झाले हे शोधण्यासाठी रोबोट आणा किंवा त्यांच्यापेक्षा विद्वान माणसे आणा. जर काही तथ्य निघाले, तर राजकीय निवृत्ती घेईन. पण हे खरे नाही. त्यांच्या तोंडाला लागणे आणि त्यांच्यासारखी टीका टिप्पणी करणे हे काही आमच्या संस्कारात बसत नाही, असे सामंत म्हणाले.

सकाळी उठले की कणकवलीत जाऊन केसरकरांवर टीका करायची. तेथून रत्नागिरीत माझ्यावर टीका, तेथून गुहागरला जाऊन भास्कर जाधवांवर टीका हे त्यांचे काम आहे. आम्ही काम करतो म्हणून निवडून येतो, हे सांगायलाही सामंत विसरले नाहीत.