शेफ विष्णू मनोहर यांनी २ हजार ५०० किलो भरीत बनवून रचला विश्वविक्रम

vishnu-manohar
जळगाव – येथील मराठी प्रतिष्ठानने शुक्रवारी ३ हजार ९०० किलो खान्देशी वांग्यांपासून २ हजार ५०० किलोचे भरीत बनवून विश्वविक्रमाला गवसणी घातली. यासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची ५ जणांची टीम आणि जळगावातील १२५ जण पहाटेपासूनच कामाला लागले होते. जळगावात या विक्रमाची नोंद घेण्यासाठी आलेले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे नागपूर येथील प्रतिनिधी गौरव द्विवेदी यांनी मराठी प्रतिष्ठानला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

जगभरात खानदेशच्या वांग्यांच्या भरीताला प्रसिद्धी मिळावी, या उद्देशाने तब्बल ३ हजार ९०० किलो वांग्यांपासून २ हजार ५०० किलो विश्वविक्रमी भरीत बनवण्यात आले. सुमारे ५ हजार किलो साहित्य मावेल अशी ५५० किलो वजनाची भव्य कढई व लोखंडी चूल कोल्हापूर येथून त्यासाठी बनवून आणण्यात आली. हे भरीत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे ५ जणांच्या टीमच्या मदतीने तयार केले गेले. गॅझेटेड ऑफिसर्स यांच्या उपस्थितीत विश्वविक्रमी भरीतासाठी लागणार्‍या वस्तूंचे मोजमाप करण्यात आले. सर्व साहित्याचे वजन गृह शाखेतील तहसीलदार मिलिंद लोखंडे यांच्या उपस्थितीत मोजण्यात आले. यात भरीताचे वांगे ३ हजार ९०० किलो, मिरच्या ३०० किलो, लसूण १२० किलो, कोथिंबीर १०० किलो, तेल १५० किलो, जिरे १० किलो, मीठ २० किलो इत्यादी वस्तूंचा समावेश होता. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी भरीत तयार करण्यासाठी सुमारे ३०० किलो सेंद्रिय मिरची उपलब्ध करून दिली. भरीताची वांगी खास यावल तालुक्यातील बामणोद येथून आणण्यात आली होती.

Leave a Comment