पालीप्रमाणे भिंतीवर चालणारा रोबो तयार

robot
हॉवर्ड युनिव्हर्सिटी आणि रोल्स रॉइस इंजिनिअर यांनी एकत्रित प्रयत्नातून भिंतीवर पालीप्रमाणे सरपटू शकणारा रोबो तयार केला आहे. या रोबोचे वजन अवघे १.४८ ग्रॅम असून त्याची लांबी ४.५ सेंटीमीटर आहे. या रोबोचे नामकरण HAMR- E असे केले गेले आहे. या रोबोचे पाय चिकट होण्यासाठी इलेक्ट्रो अॅडेसीव्हचा वापर केला गेला आहे. जी कामे मानव सहजी करू शकत नाही ती कामे हा रोबो सहज करू शकणार आहे.

हा रोबो वर चढेल, उतरेल, छोट्या जागेत जाईल. विमाने, जेट इंजिने यासारख्या यंत्रांची सफाई हा सहज करू शकेल. याचे पाय पृष्ट्भागाला चिकटत असले तरी सहज सोडविता येतात कारण त्यासाठी विजेचा वापर केला जातो. म्हणजे स्वीचऑन केल्यास या रोबोचे पाय पृष्ट्भागाला चिकटतील, स्वीचऑफ केल्यास सुटतील. त्याला ऑपरेट करण्यासाठी व्होल्टेजची गरज असल्याने तो घसरत नाही अथवा पडत नाही.

या रोबोला खास प्रकारचे जॉइंट आहेत. त्यामुळे तो गोलाकार पृष्ठभाग, उंच सखल जागेत चढू शकतो. त्याचे पाय गोलाकारही फिरू शकतात. त्याला खास वॉकिंग पॅटर्न दिला गेला आहे ज्यामुळे तो तीन पायांनी पृष्ठभागावर चिकटेल आणि एका पायाने पुढे मागे होऊ शकेल. हा रोबो एकावेळी १०० पावले चालू शकतो. मोठ्या मशीन्सची सफाई करण्यासाठी ते उपयुक्त ठरतील व त्यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होईल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment