भीम आर्मीने केली संभाजी भिडेंना तडीपार करण्याची मागणी

sambhaji-bhide
पुणे – दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2019 ला राज्यातील अनेक भागातील नागरिक लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यास येणार आहेत. गतवर्षीची घटना लक्षात घेता भीम आर्मी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी 25 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 पर्यंत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाच जिल्ह्यातून तडीपार करावे आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. त्यांनी ही मागणी केली.

भीमा कोरेगाव येथे गतवर्षी 1 जानेवारी दरम्यान घडलेल्या दंगली प्रकरणी सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई मिलिंद एकबोटे, मनोहर एकबोटे यांच्यावर करताना दिसत नसल्याचा आरोप दत्ता पोळ यांनी यावेळी केला. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, 30 डिसेंबर 2018 ला दुपारी तीन वाजता पुण्यात भीमा कोरेगाव संघर्ष महासभेला भीम आर्मी संघटनेचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा होणार असून या सभेला परवानगी देण्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण भिडेंना मागील वर्षभरात पोलीस आणि प्रशासन राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम किंवा सभा घेण्यास परवानगी देत आहे, असा दुजाभाव होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत आम्ही चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा घेणार असून त्या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास न्यायालयात दाद देखील मागितली जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली.